लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरासह उपनगरांमध्ये अनेक कॉलनी आणि नववसाहतींच्या भागात ठिकठिकाणी उघड्या रोहित्रांमुळे धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात उघड्या रोहित्रांतील तारांमधून जमिनीत वीजप्रवाह उतरून विजेचा धक्का लागून प्राणहानी होण्याचे प्रकार घडत आहेत. सिडको परिसरातील पवननगर भागात गेल्या बुधवारी उघड्या वीजतारांचा धक्का लागून एक गाय मृत्युमुखी पडली. तसेच एका महिलेला विजेचा शॉक लागला. गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी उघड्या वीजतारा, उघड्या पडलेल्या भूमिगत वीजतारा, उघडे रोहित्र यांच्यानजीक शॉक लागल्याचे जीवघेणे प्रकार घडले. वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंबंधी वारंवार तक्रार करूनही उघड्या रोहित्रांना झाकणे बसविण्यात आलेले नाहीत. विशेषत: सिडको परिसरांत अनेक चौकांच्या कोपऱ्यात उघडी रोहित्रे असून, काही ठिकाणी तर उद्यानांच्या मध्येच रोहित्र बसविण्यात आलेले आहे. या रोहित्रांची झाकणे भुरट्या चोरट्यांनी लंपास केल्याने अनेक महिन्यांपासून ही रोहित्रे उघडीच आहे. त्यातून वीजप्रवाह वाहत असल्याने याठिकाणी उद्यानात खेळणाऱ्या मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच रोहित्रांच्या खाली उगवलेले गवत खाण्यासाठी गायी वासरे येतात. तसेच या ठिकाणी टाकलेले शिळे अन्न खाण्यासाठी कुत्रे फिरतात. या मुक्या जनावरांनादेखील शॉक लागून मृत्यू होऊ शकतो, असे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार पावसाळ्यात घडत आहेत. कारण याठिकाणी पाण्यामुळे जमिनीत वीज प्रवाह उतरतो. इंदिरानगर, सातपूर, पंचवटीसह अंबड, कामटवाडे, डीजीपीनगर आदि भागांत अनेक ठिकाणी असलेल्या उघड्या रोहित्रांना तातडीने झाकणे बसविण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.या ठिकाणी आहेत धोकादायक रोहित्रे इंदिरानगर परिसरातील पुष्प उद्यानासमोरील परिसर. कमोदनगर भागातील मोकळ््या जागेत.सिडको परिसरातील तोरणानगरजवळील मोती चौक भागात. आयटीआय पुलाजवळील शाहूनगर येथे.जेलरोड, कॅनॉलरोड, पंचगंगा सोसायटीजवळ. नाशिकरोड दत्तमंदिरजवळील ऋतुरंग भवनाजवळ. देवळालीगावातील सावतामाळी हॉटेल परिसर.
शहरातील उघड्या रोहित्रांचा धोका
By admin | Updated: July 16, 2017 00:04 IST