नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्याच आलेल्या बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षेचा नाशिक विभागाचा एकूण निकाल २७.१८ टक्के, तर नाशिक जिल्ह्याचा निकाल २० टक्के लागला आहे. विभागात सर्वाधिक विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातून परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अल्प असल्याचे निकालावरून लक्षात येते. चारही जिल्ह्यांमध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उत्तीर्णतेचे प्रमाण यामध्ये प्रचंड तफावत असल्याने निकालावर त्याचा परिणाम झाला आहे. अनुत्तीर्ण फेरपरीक्षेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी अवघा तीन महिन्यांचा कालावधी होता. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत ३ सप्टेंबरपर्यंत असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित शुल्कासह मंडळाकडे आॅनलाइन निकालाची प्रत किंवा गुणपत्रिकेची सत्य प्रत जोडणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज विभागीय मंडळाच्या कार्यालयात सादर करावा. आठवडाभरात मंडळाकडून महाविद्यालयांना गुणपत्रिका पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर गुणपत्रिका वाटपची तारीख महाविद्यालयांकडून निश्चित केली जाणार आहे. नाशिक विभागाचा निकाल गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आठ टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात आली होती त्यावेळी नाशिकचा निकाळ १९.९० टक्के इतका लागला होता. नाशिकमध्ये फेरपरीक्षेत केवळ एका विद्यार्थ्याने गैरमार्गाचा अवलंब केला. तर जळगावमध्ये दोन विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला. (प्रतिनिधी)
नाशिक विभागाचा निकाल २७ टक्के
By admin | Updated: August 25, 2016 00:58 IST