नाशिक : प्रस्तावित वीज दरवाढीला तीव्र विरोध करीत नाशिककरांनी कोणत्याही परिस्थितीत वीज दरवाढ लागू करू नये, अशी मागणी करतानाच आयोगाच्या अस्तित्वावरदेखील प्रश्न उपस्थित केला. सुनावणीची केवळ औपचारिकता न राहता ग्राहकांच्या भावनेचा आदर राखला जावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. प्रस्तावित वीज दरवाढीसंदर्भात वीज नियामक आयोगाने नियोजन भवन येथे सुनावणी घेतली. या सुनावणी दरम्यान नाशिककरांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला. सुनावणीला उपस्थित शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक व सामान्य ग्राहकांसह विविध संघटनांनी व राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला. यावेळी सुमारे ३० ग्राहकांनी त्यांच्या लेखी अथवा प्रत्यक्ष सूचना व तक्रारींचे निवेदन आयोगासमोर सादर केले. तर १५ जणांनी ऐनवेळी नाव नोंदवून वीज दरवाढीविरोधात त्यांच्या सूचना व हरकती सादर केल्या. महावितरणकडून योग्य सेवा मिळत नाही आणि तरीही वीज नियामक आयोगाकडून कोणतीही दरवाढ मंजूर केली जाते. त्यामुळे हा आयोगाचा फास कशासाठी असा संतप्त सवाल वीज ग्राहकांनी यावेळी उपस्थित केला. आयोगाचे सदस्य अजीज खान, दीपक लाड व आयोगाचे सचिव अश्वनी कुमार यांच्या त्रिसदस्यीय समितीने घेतलेल्या या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख तथा नगरसेवक अजय बोरस्ते यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी इतर विभागांच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात वीजदर अधिक प्रमाणात आकारले जात असून, हा उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय असल्याचे मत व्यक्त करीत दरवाढीविरोधात शिवसेना स्टार्ईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने दरवाढीला विरोध केला.
वीज दरवाढीला नाशिककरांचा विरोध
By admin | Updated: July 26, 2016 00:48 IST