सिन्नर : बारागावपिंप्री रस्त्यालगत व सिन्नर न्यायालयाच्या जवळच असणाऱ्या खर्जे मळा परिसरात अनेक दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, पिण्याच्या पाण्याचेही हाल होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहराच्या अगदी जवळ असलेल्या खर्जे मळा व शिवशक्तीनगर भागात अनेक दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेकदा विजेची उपकरणे लागत नाही. पुरेशा दाबाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी पाठपुरावा केला तसेच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून, निवेदनावर नगरसेवक मल्लू पाबळे, दौलत आंधळे, भगवान सटवे, अशोक शिंदे, अंबादास सापनर, देवीदास छल्लारे, दत्ता जोशी, अंबादास सापनर, संजय चव्हाणके, गणेश खर्जे, मुकुंद खर्जे यांच्यासह रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
विस्कळीत वीजपुरवठ्याने रहिवासी संतप्त
By admin | Updated: January 20, 2017 23:05 IST