नाशिक : ललित मोदी प्रकरणापासून पाकिस्तानच्या नवाज शरीफ यांच्या भेटीपर्यंत उठलेले केंद्र सरकारविरोधी वावटळ आणि बोगस पदवी प्रकरणापासून ते चिक्की खरेदी घोटाळ्यापर्यंत उठलेली वादळे थांबविण्यासाठी काल (दि.१४) केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरी मंदिरात जाऊन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. सिंहस्थ कुंभमेळा महापर्वाच्या प्रारंभाला अवघे काही क्षण बाकी राहिलेले असतानाच काल (दि.१४) त्र्यंबकेश्वरी मुक्कामी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जाऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यावेळी धार्मिक विधी व पूजापाठ करण्यासाठी स्थानिक पुरोहित संघाचे पदाधिकारीही उपस्थित असल्याचे कळते. तसेच यावेळी त्यांच्यासमवेत षडदर्शन आखाड्याचे अध्यक्ष महंत सागरानंद सरस्वती महाराज, तसेच जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. सध्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला वेगवेगळ्या घोट्याळांवरून आणि बोगस पदवी प्रकरणावरून घेरले जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अधिवेशन सुरळीत पार पडू दे, असेच साकडे त्र्यंबकराजाला घातल्याची चर्चा उपस्थितात होती. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही त्र्यंबकराजाचे दर्शन घेत केंद्र सरकारविरोधातील विघ्ने दूर होऊ दे, असे साकडे घातल्याचे समजते. यावेळी त्यांच्या समवेत महंत अवधेशानंदगिरीजी महाराज, महंत नरेंद्रगिरीजी महाराज आदि उपस्थित होते.(विशेष प्रतिनिधी)
‘त्र्यंबकराजा’ विघ्ने दूर कर
By admin | Updated: July 15, 2015 01:32 IST