नामपूर : समाजमनात व सर्व समाजात प्रेमभाव निर्माण व्हावा, एकजिनसीपणा यावा या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. सध्या मात्र अनेक ठिकाणी हा भाव कोठेही दिसत नसला तरी नामपूर येथील आनंद गणेश मंडळाचे युवक विविध उपक्रमांतून लोकमान्यांचा वारसा जपताना दिसत आहेत.नाशिकचे लखन सावंत, अनिल सावंत, अक्षय सावंत हे दरवर्षी गणेशोत्सवासाठी नामपूरला येतात. सोबत व्यावसायिक जयेश सावंत, राकेश सावंत, निखिल पवार व राकेश पाटील हे सुद्धा असतात. पर्यावरणाचा विचार करता मूर्तीचे विसर्जन न करणे, वाद-विवाद टाळण्यासाठी विसर्जन मिरवणूक वेगळ्या पद्धतीने काढणे. सर्वांच्या मनांची गुंफण होण्यासाठी स्टेज उभारणीपासून बांधणीपर्यंत मंडळाचे युवक श्रमदान करताना एकत्र येतात.टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवास १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रकार नयन नगरकर यांनी रेखाचित्रातून टिळकांचा जीवनप्रवास उलगडला आहे. यात मंडालेच्या तुरुंगातील टिळक व त्यांच्याकडून साकार झालेला गीतारहस्य ग्रंथ, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या घोषणेपासून तर लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आदि घटनांना नगरकरांनी चित्रांकित केले आहे. आनंद गणेश मंडळाचे हे ४३ वे वर्ष आहे. विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा मंडळाचा उद्देश आहे. साक्षरता, व्यसनमुक्ती, लेक वाचवा- लेक शिकवा यासंदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘अंध डोळस हसरा कळस’ हा कवी जगदीश देवपूरकरांचा व अंध कलावंत प्रवीण पाटील यांचा कार्यक्रम समाजप्रबोधनाचे माध्यम ठरले. मंडळाच्य युवकांना प्रेरणा देण्यासाठी मंडळाचे जुने जाणते कवीवर्य कमलाकर देसले, तुळजाई मंडळाचे जगदीश सावंत व सुरेंद्र वाघ प्रयत्नशील आहेत. यांच्या मार्गदर्शनातून मंडळाची वाटचाल सुरू आहे. (वार्ताहर)
लोकमान्य टिळकांचे स्मरण
By admin | Updated: September 13, 2016 00:48 IST