नाशिक : गंगापूर धरणाच्या वरच्या बाजूला असलेली कश्यपी आणि गौतमी गोदावरी ही दोन्ही धरणे भरल्यानंतर गंगापूर धरणात पाटबंधारे विभागाकडून त्यामधून पाणी सोडले जाते. परंतु यंदाची पाणीस्थिती पाहता कश्यपी व गौतमीचे पाणी न अडवता ते अगोदर गंगापूर धरणात सोडावे, अशा मागणीचे पत्र पाटबंधारे विभागाला महापालिकेने दिले आहे. गंगापूर धरणात वरच्या बाजूला असलेल्या कश्यपी आणि गौतमी गोदावरी या दोन लघु प्रकल्पातून पाणी सोडले जाते. सदर दोन्ही धरणे भरल्यानंतर कश्यपी व गौतमीचे गेट मोकळे केले जाते. कश्यपी धरणाची पाणीसाठवण क्षमता १८५२ दलघफू असून, गौतमी गोदावरीची क्षमता १८६८ दलघफू इतकी आहे. सद्यस्थितीत दोन्ही धरणे पूर्णत: कोरडी पडलेली आहेत. त्यामुळे गंगापूर धरणातील आरक्षित पाण्यावरच महापालिकेला विसंबून राहावे लागत आहे. गंगापूर धरणातून ६०१ मीटरपर्यंतच पाणी उचलण्याची यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध आहे. सद्यस्थितीत सदर पाण्याची पातळी ६००.३१ इतकी आहे. ती आणखी खालावल्यास महापालिकेला जादा पंपिंग लावून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. महापालिकेने त्यासाठी कोट्यवधी रुपयांची निविदाप्रक्रिया राबविलेली असून, गरज भासल्यास प्रत्यक्ष कार्यादेश द्यावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)
गौतमी-कश्यपीचे पाणी सोडावे
By admin | Updated: July 5, 2016 00:24 IST