आपल्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. याबाबत राज्य शासनाला निवेदन देण्यात येऊन सप्टेबरमध्ये संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता पंधरवडा उलटूनही निर्णय झालेला नसल्याने मंगळवारपासून संपाला सुरूवात हेाण्याची शक्यता आहे.रात्री उशीरापर्यंत संघटनेची शासनाबरोबरच चर्चा सुरू होती.
नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यामध्ये उद्या (दि. २१) पासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. मागील पाच ते सहा वर्षापासून पदोन्नतीचा प्रश्न रखडलेला असल्याने पदोन्नतीची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू करू नये अशी महत्त्वाची मागणी करण्यात आलेली आहे. याबरोबरच विभागातील रिक्त पदे तत्काळ भरणे, कोविड- १९ मुळे मयत झालेल्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत देणे व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर विभागात नोकरीस घेण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे.