लासलगाव : भारतातील द्राक्ष उत्पादनावर परदेशातून कोट्यवधींचे परकीय चलन मिळते. त्यासाठी केंद्र सरकार नियंत्रित अँपेडा व इतर संस्थांद्वारा द्राक्ष निर्यात होते. देशातील शेतकऱ्याने संशोधित केलेल्या द्राक्षवाणाचा मात्र परकीय नावानेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गाजावाजा होत असून शासनाच्या दुर्लक्षामुळे स्वदेशी जात व प्रतवारीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेख होत नसल्याने यात लक्ष घालण्याची मागणी सुधाकर सीडलेस या द्राक्षवाणाचे संशोधक सुधाकर क्षीरसागर यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की सुधाकर क्षीरसागर यांना रंग, आकार, चव, साठवण क्षमता, पानांचा आकार, पानांची रचना इत्यादींमध्ये वेगळी वनस्पती आढळली. त्या रोपांच्या यशस्वी परिणामाची खात्री केल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्या वनस्पतीचा विस्तार केला. त्या विस्तारातून सदरचे वाण वेगवेगळ्या माध्यमातून लागवडीखाली आणले होती. सुधाकर सीडलेस या देशात संशोधित झालेल्या वाणाची निर्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसऱ्याच नावाने केली जात आहे. स्वदेशी उत्पादित वाणांतून मिळणारे परकीय चलन व आयात केलेल्या वाणांतून मिळणारे परकीय चलन यांचा तुलनात्मक अभ्यास करता स्वदेशातील द्राक्ष वाण सरस असल्याचे स्पष्ट होते. याचा केंद्र शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे तसेच राज्य व केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून याबाबत दखल घेणेदेखील गरजेचे असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.