नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला शासनाकडून दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ३५ कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती समितीच्या मासिक बैठकीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.समाज कल्याण सभापती उषा बच्छाव यांच्या उपस्थितीत मासिक बैठक झाली. बैठकीत समाज कल्याण विभागाकडील योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद उत्पन्नाच्या ३ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंगांच्या योजनांकरिता अटी व शर्ती निर्गमित केल्या असून त्याबाबतच्या सूचना संबंधित पंचायत समित्यांना कळविण्यात आलेल्या आहेत. तेव्हा अपंग बांधवांनी शासन निर्णयानुसार त्यांना आवश्यक असलेल्या योजनांची विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत / पंचायत समितीमधून प्राप्त करून घेऊन परिपूर्ण अर्ज संबंधित ग्रामसेवकांकडे करायचा असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यामध्ये लाभार्थीने अर्ज केलेल्या वस्तूंची किंमत थेट लाभार्थीच्या बॅँकेच्या वैयक्तिक खात्यात समाज कल्याण विभागामार्फत जमा करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. अपंग व्यक्तींनी त्यांना हवे असलेल्या योजना व त्यानुसारचे विहित नमुन्यातील अर्ज तत्काळ ग्रामसेवकांकडे सादर करण्याचे आवाहन सभापती उषा बच्छाव यांनी केले आहे. बैठकीतच प्रभारी समाज कल्याण अधिकारी डी. जी. नांदगावकर यांनी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत करावयाच्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ३५ कोटी ३५ लाखांचा निधी प्राप्त झाला असून त्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा केली. नवीन शासन निर्णयानुसार दलितवस्ती सुधार योजनेच्या कामांचे नियोजन करण्याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नव्हे, तर समाज कल्याण समितीला देण्यात आल्याबाबत बैठकीत चर्चा झाली. बैठकीस सदस्य साईनाथ मोरे, सीमा बस्ते, शीतल कडाळे, सुभाष गांगुर्डे, बंडू गांगुर्डे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दलितवस्तींसाठी ३५ कोटींचा निधी प्राप्त
By admin | Updated: July 28, 2016 00:26 IST