नाशिक : स्त्री-पुरुष वंध्यत्वाचे रुग्ण अलीकडच्या काळात वाढत आहेत. वंध्यत्वाचे मूळ कारण हे बदललेली जीवनशैली असून, त्याचे दुष्परिणाम अत्यंत घातक आहेत. वंध्यत्व निवारणासाठी आयुर्वेदातील पंचकर्म ही चिकित्सा महत्त्वाची ठरते. त्याचप्रमाणे भस्ती चिकित्सेअंतर्गत गुद्द्वारमार्गे तेल, काढा, विशिष्ट औषधे देणे हा उपाय प्रभावी ठरत असल्याचे प्रतिपादन वैद्य सुभाष मारलेवार यांनी आयुर्वेद व्यासपीठाच्या नाशिक शाखेने आयोजित केलेल्या ‘रुग्णानुभव’ या परिसंवादात ते बोलत होते.परिसंवादाची सुरुवात अपूर्वा तुंगार आणि नेहा वाळवेकर यांनी गायलेल्या धन्वंतरी स्तवनाने झाली. मारलेवार पुढे बोलताना म्हणाले की, शरीरातील कफ दोष वाढला असेल आणि ते जर वंध्यत्वाचे कारण असेल तर त्यासाठी वमन हादेखील उपचार करावा, तसेच पित्तदोषामुळे वंध्यत्व आले असल्यास विरेचन ही चिकित्सा प्रभावी ठरते, असे सांगतानाच बडीशोप, कोरफड, फलघृत ही औषधे वंध्यत्व चिकित्सेसाठी उपयोगी पडतात. गणेशवाडी येथील आयुर्वेदीक रुग्णालयात आयोजित ‘रुग्णानुभव’ या परिसंवादात वैद्य एकनाथ कुलकर्णी यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले, तर संतोष पाठक यांनी आभार मानले. मृदुला दीक्षित यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विद्यानंद लॅबचे संचालक वैद्य आनंद जळुकर, विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी वृंद यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वंध्यत्वाला बदललेली जीवनशैली कारणीभूत
By admin | Updated: July 29, 2015 00:25 IST