नाशिक : आरोग्य शिक्षण आणि संशोधनात काम करण्याबरोबरच राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील जनतेलादेखील सुलभ आरोग्यसेवा कशी पुरविता येईल या दृष्टीने विद्यापीठाने कुशल मनुष्यबळ निर्माण केले पाहिजे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाराज यांनी केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, आमदार जयप्रकाश मुंदडा, सतीश पाटील आदि आदिसभा सदस्य उपस्थित होते. यावेळी महाजन म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सेवेच्या गरजा तसेच समस्या लक्षात घेऊन कुटुंब कल्याण, बालरोग, पोषण, साथीचे आजार व आयोग्य जीवनशैलीमुळे होणारे आजार यावर संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. राज्याच्या आदिवासी व दुर्गम भागात तळागाळातील लोकांपर्यंत पूरक आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी दर्जेदार संस्थांच्या मदतीने आभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्य शिक्षण कसे पोहचेल यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही महाजन म्हणाले. आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले. विद्यापीठाने सन २०१७-२२ या कालावधीसाठी तयार केलेला बृहत आराखडा सर्व समावेशक व्हावा यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. राज्यातील आरोग्य सेवेच्या गरजा व त्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टर्स तयार करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असेही कुलगुरू म्हणाले. सूत्रसंचालन प्रभारी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी केले. यावेळी आमदार जयप्रकाश मुंदडा, सतीश पाटील, पी. एम. जाधव, डॉ. मानसिंग पवार, डॉ. सुधीर ननंदकर, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. प्रफुल्ल पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचवावी
By admin | Updated: August 14, 2016 23:33 IST