नाशिक : पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना बढती मिळाल्याने त्यांची मुंबईला बदली झाली. त्यांच्याकडून मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार मंगळवारी (दि. २३) संध्याकाळी सहा वाजता स्वीकारला.भारतीय पोलीस सेवेतील सहा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा शासन निर्णय सोमवारी (दि. २२) जाहीर झाला. दरम्यान, जगन्नाथन यांची अपर पोलीस महासंचालक म्हणून मुंबई येथे प्रशिक्षण व खास पथकांच्या विभागात पदस्थापना करण्यात आली. त्यांनी पोलीस आयुक्तपदाचा कारभार दीड वर्ष सांभाळला. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याचा चोख पोलीस बंदोबस्त आणि मैत्रेय घोटाळ्याचा योग्य तपास आणि पाठपुरावा या दोन महत्त्वाच्या कामगिरी बजावल्या. दीड वर्षाच्या कालावधीमध्ये नाशिकच्या गुन्हेगारी क्षेत्राबाबतही त्यांनी विशेष लक्ष घालून बहुसंख्य सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. आयुक्तालयात जगन्नाथन यांना निरोप देण्यासाठी शहरातील विविध मान्यवर तसेच पोलीस अधिकाऱ्यांची वर्दळ सुरू होती. त्यांच्या हस्ते पोलीस नियंत्रण कक्षात सर्व्हर कक्षाचे उद्घाटनही सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पार पडले. सायंकाळी साडेपाच वाजेपासूनच पोलीस उपआयुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, डॉ. सीताराम कोल्हे, मधुकर कड, सदानंद इनामदार आदि उपस्थित होते.
रवींद्र सिंघल यांनी स्वीकारला पदभार
By admin | Updated: August 24, 2016 00:35 IST