हनुमानवाडी : पंचवटीत हनुमानवाडी परिसरातील अनेक रेशन दुकानदार सोयीने दुकाने उघडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. शासनाने निर्धारित वेळा ठरवून दिल्यानंतरही दुकानदार दुकाने बंद ठेवत असल्याने नागरिकांना अकारण चकरा घालाव्या लागत आहे.हनुमानवाडी परिसरात सात शासनमान्य रेशन दुकाने आहेत; परंतु पंचवटीतील लोकांची संख्या बघता ही दुकाने कमीच आहे. यात क्रांतिनगर, मखलाबाद नाका व हनुमानवाडी परिसरात प्रत्येकी दोन, तर मधुबन कॉलनीत एक अशी सात दुकाने आहेत. दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ६ अशी आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही दुकाने वेळेवर उघडली जात नाही. परिणामी कामावर निघून जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा दुकान सुरू आहे किंवा नाही हे बघण्यासाठी हेलपाटे घालावे लागतात. अनेक दुकानदार यासंदर्भात नीट उत्तरेही देत नाही, काही जण दुकानात काम करणारा कामगार वेळेत येत नसल्याचे सांगतात. कारणे काहीही असली तरी वेळेवर दुकाने सुरू नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे पुरवठा विभागाने यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. केवळ दुकानांच्या वेळेचाच प्रश्न नाही तर धान्याची उपलब्धता आणि दरांविषयीही तक्रारीही करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
पंचवटीतील रेशन दुकानदारांची मनमानी
By admin | Updated: January 16, 2015 00:11 IST