पिंपळगाव बसवंत : आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील अवसायनात असलेला रानवड सहकारी साखर कारखाना हा स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने पुढील १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला असून, सदर कारखान्याचा पुढील हंगामासाठी दि.१ ऑगस्टपासून ऊसनोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार आजपावेतो सुमारे ९०० हेक्टरवरील उसाची नोंदणी करण्यात आलेली आहे.
आमदार दिलीप बनकर यांच्या आधिपत्याखाली असलेल्या पतसंस्थेने केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी यामध्ये ८६०३२ उसाची जातीच्या सुमारे ७०० हेक्टर, तर ३१०२ उसाची जातीच्या सुमारे १०० हेक्टर, ८००२ उसाची जातीच्या सुमारे ५० हेक्टर व २६५ ऊसाची जातीच्या सुमारे ५० हेक्टर शेतकऱ्यांनी उसाची नोंद केलेली आहे.
काही वर्षांपासून निफाड तालुक्यातील तीनही साखर कारखाने बंद असल्याने बाहेरील जिल्ह्यांतील कारखान्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू होती. तालुक्यातील कारखाने सुरू व्हावेत, ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होती.
या सर्व जातींच्या आडसाली उसाची प्राधान्यक्रमाने नोंदणी करून ऊसतोडणी केली जाणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे यांनी सांगितले.