पंचवटी : श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात श्रीराम व गरुडाची रथयात्रा काढण्यात येणार आहे. कामदा एकादशीला रथोत्सव असल्याने त्यादृष्टीने रथोत्सव समितीतर्फे रथोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. श्रीराम रथाला तसेच हनुमान मूर्तीला रंगरंगोटीचे तसेच रथाच्या चाकांना रंगकाम करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. रथाला रंगकाम करण्यापाठोपाठ रथाची चाके तसेच ब्रेकची तपासणी करणे, चाकांना वंगण लावणे आदि कामे करण्यात आली असून रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. रविवारी (दि. १७) रोजी रथोत्सव असल्याने शुक्रवारपावेतो रथाची सजावट तसेच रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचे राम रथोत्सव समितीचे अध्यक्ष राकेश शेळके यांनी सांगितले. रथोत्सवाच्या रंगरंगोटी पाठोपाठ भाविकांकडून देणगी जमा करणे तसेच रथोत्सवाच्या दिवशी वाद्यवृंद तसेच ढोल ताशांचे पथक ठरविण्याचे काम समितीकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. रामरथाची रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाईचे काम झाल्यानंतर रथोत्सवाच्या पूर्वसंध्येला रथाची पारंपरिक पद्धतीने श्री काळाराम मंदिरपर्यंत मिरवणूक काढण्यात येऊन रथ राममंदिराच्या पूर्व दरवाजासमोर उभा केला जाणार आहे. (वार्ताहर)
रामरथाला रंगरंगोटी सुरू
By admin | Updated: April 10, 2016 00:32 IST