नाशिक : जिल्ह्णात मंगळवारी दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात सायंकाळनंतर सुरू झालेल्या पावसाची उशिरापर्यंत रिपरिप सुरूच होती. दमदार पावसामुळे खरिपाच्या जुलै अखेरपर्यंत शंभर टक्के क्षेत्रावरील पेरण्या होण्याची चिन्हे आहेत.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात उघडीप घेतल्याचे चित्र होते. दुपारनंतर मात्र शहरात वातावरणात अचानक बदल होऊन साडेचार वाजेपासून तुरळक पावसाला सुरुवात झाली. साडेपाच वाजेपासून सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. पृष्य नक्षत्रात मोर वाहन असल्याने पावसाने दमदार हजेरी लावल्याचे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे. आगामी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात आश्लेषा नक्षत्र सुरू होत असून, आश्लेषा नक्षत्रातही जोरदार पावसाची शक्यता पंचागकर्त्यांनी वर्तविली आहे. मागील आठवड्यात खरिपाच्या लागवडीखालील ६ लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ३ लाख ९४ हजार हेक्टर (७४ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्यांची लागवड झाली आहे. धरणांमधील पाणीसाठ्यातही दमदार पावसाने चांगली वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा ७४ टक्के तर दारणा धरणाचा पाणीसाठा ७६ टक्केपर्यंत पोहोचला आहे. अद्यापही संपूर्ण आॅगस्ट व सप्टेंबर महिना जाणे बाकी असल्याने यंदा चांगला पाऊस झाल्यास पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता आहे.
पुष्य नक्षत्रावर पावसाची दमदार हजेरी
By admin | Updated: July 26, 2016 23:53 IST