नाशिक : गुरुवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी नाशिकसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसभर आपली हजेरी कायम ठेवून पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले. येत्या चोवीस तासांत उत्तर महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांतून थांबविलेला विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आल्याने नद्या, नाल्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी विश्रांती घेतल्यामुळे मंगळवारच्या पुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी चांगलाच अवधी मिळाला. जनजीवन सुरळीत होत असतानाच शुक्रवारी सकाळपासून पुन्हा श्रावणसरींनी हजेरी लावली. सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे नोकरी, धंद्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली, तर मुलांनाही पावसापासून बचाव करीत शाळा गाठावी लागली. त्यानंतर दिवसभर पाऊस कायम राहिला. नाशिक शहरात शुक्रवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत ३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली असली तरी, पाच वाजेनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला, रात्री उशिरापर्यंत हा जोर कमी अधिक होता. जिल्ह्णातही पावसाने हजेरी कायम ठेवली. सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत १९२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी रात्रीनंतर कमी करण्यात आलेला धरणातील विसर्ग पुन्हा सायंकाळी पाच वाजेनंतर पाटबंधारे खात्याने वाढविला. येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धरणातील विसर्गपावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्णातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून गोदावरी नदीत १२९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता; मात्र सायंकाळी पाच वाजेनंतर धरणक्षेत्रातील पावसाचा जोर पाहता तो ६१६९ क्युसेकने वाढविण्यात आला. जिल्ह्णातील अन्य धरणांतून सायंकाळी पाच वाजता करण्यात आलेला विसर्ग पुढील प्रमाणे-भावली-८७२, पालखेड-६००६, करंजवण-१०००, वाघाड-१७३०, पुणेगाव-५७३, दारणा-१५४१२, भावली-४८१, वालदेवी-१०५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दक्षतेचे आदेशहवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या चोवीस तासांत उत्तर मध्य महाराष्ट्रात १२४ ते २४४ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्ह्णातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदी,नाल्याकाठच्या गावांना सावधानतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पावसाची पुन्हा हजेरी
By admin | Updated: August 6, 2016 01:27 IST