नाशिक : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये चांगली हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ८ जुलैअखेर जिल्ह्यातील सहा लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख २७ हजार हेक्टर (१९.२०) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाची अशीच हजेरी कायम राहिल्यास खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.खरिपाच्या पेरण्या पाऊस नसल्याने लांबल्या होत्या. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सलग हजेरी लावल्याने बळीराजाची खरीप पेरण्यांची लगबग वाढली होती. शुक्रवारी (दि.८) दुपारनंतर पुन्हा शहरासह जिल्ह्णातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. जिल्ह्णात खरिपाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६ लाख ५२ हजार हेक्टर असून, त्यापैकी १ लाख २७ हजार १३० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहे. खरिपात भात, नागली, बाजरीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. तसेच मका व सोयाबीनचे क्षेत्रही अधिक आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली नव्हती. मात्र जुलैतील पावसाची हजेरी पाहता बळीराजाने खरिपाच्या पेरण्या आटोपण्यासाठी लगबग सुरू केली आहे. खरिपाच्या पेरण्या झालेल्या क्षेत्रात भात, नागली, ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, भूईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. सोयाबीन पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ५७ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळनंतर अर्धा तास पावसाने शहर परिसरात दमदार हजेरी लावली. दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. (प्रतिनिधी)
पावसाची हजेरी कायम; २० टक्के पेरण्या पूर्ण
By admin | Updated: July 9, 2016 00:33 IST