मनमाड : जंक्शन रेल्वेस्थानकावर बुकिंग कार्यालयाच्या आवारात सहाऱ्याला आलेल्या भिकाऱ्यांना लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून चोप दिल्याची घटना घडली असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या लोहमार्ग पोलिसांच्या या दबंगगिरीबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या सर्वत्र थंडीचा कडाका वाढला असून, मनमाड शहर सुद्धा गारठले आहे. या वाढत्या थंडीमुळे शहरातील भिकारी निवाऱ्यासाठी येथील जंक्शन रेल्वेस्थानकाचा आश्रय घेत आहे.येथील बुकिंग कार्यालय तसेच फलाट, पादचारी पूल आदि ठिकाणी रात्रीच्या वेळी भिकारी व मनोरुग्ण पहावयास मिळतात. रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या भिकाऱ्यांना स्टेशनमधून नेहमी बाहेर काढण्यात येत असले तरी बुधवारी रात्री मात्र भिकारी हुसकावून लावण्याच्या प्रकाराने प्रवासी सुद्धा हादरले. येथील बुकिंग कार्यालयासमोर झोपलेल्या भिकाऱ्यांना लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्याने काठी टोचून उठवले. त्यानंतर या कर्मचाऱ्याने आपली मर्दुमकी दाखविण्यासाठी भिकाऱ्यांना काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यावेळी भिकाऱ्याने सुद्धा कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या संतापाचा उद्रेक झाला. सदर घटनेबाबद अद्याप पर्यंत कुणीही तक्रार दाखल केली नसली तरी सदरचा प्रकार वरिष्ठांना कळवणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले. (वार्ताहर)
रेल्वे पोलिसांची ‘दबंगगिरी’!
By admin | Updated: January 13, 2017 00:19 IST