नाशिक : पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जाण्यासाठी नाशिकरोड येथून १ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता रवाना होणार आहे. दरम्यान, संमेलनासाठीची नोंदणी मुदत आणखी तीन दिवस वाढविण्यात आली आहे. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात अधिकाधिक रसिकांनी सहभागी व्हावे, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद तसेच घुमान येथील स्थानिक आयोजकांचा प्रयत्न सुरू आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी बारा बलुतेदार महासंघाकडे नाशिकच्या नोंदणीची सूत्रे दिली होती. त्यानुसार शेकडो नाशिककरांनी नोंदणी केली आहे. तीन हजार रुपये असे संमेलनाचे शुल्क असून, त्यात दोन्ही बाजूंचा प्रवास, निवास व भोजन व्यवस्थेचा समावेश आहे. साहित्य संमेलन येत्या ३, ४ व ५ एप्रिल रोजी होणार असून, रसिकांच्या सोयीसाठी नाशिकरोड येथून १ एप्रिल रोजी श्री गुरुनाथ देवजी एक्स्प्रेस पहाटे चार वाजता रवाना होणार आहे. ही गाडी भुसावळ येथे सकाळी ७.३० वाजता, अकोल्याला ९.४० वाजता, नागपूर येथे दुपारी ३.२५ वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास ५ एप्रिल रोजी उमरतांडा येथून होईल. दरम्यान, या संमेलनासाठीची नोंदणीची मुदत तीन दिवस वाढविण्यात आली असून, रसिकांनी अशोकस्तंभ येथील बारा बलुतेदार संघाच्या कार्यालयात अरुण नेवासकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घुमानसाठी नाशिकहून १ एप्रिलला रेल्वे
By admin | Updated: March 22, 2015 23:45 IST