नाशिक : संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास वरुणराजा शहरात चांगला बरसला. यावेळी अचानक आलेल्या पावसाने नाशिककरांची तारांबळ उडाल्याचे पाहून रोडरोमियोंनी कॉलेजरोडवर दुचाकीस्वार युवतींची छेड काढण्याची संधी साधली. भरधाव वेगाने कॉलेजरोड परिसरात रोडरोमियो बाईकर्सनी धुमाकूळ घातला. त्यांनी पावसामध्ये भिजत दुचाकीवरून घराकडे जाणाऱ्या युवतींची छेड काढली. एकीकडे अचानक आलेल्या पावसामुळे युवतींचे घराकडे जाताना चांगलेच हाल झाले. पावसाचा अंदाज न घेतल्यामुळे बहुतांश महिला, युवती रेनकोट न घेताच बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे पावसामध्ये भिजत घरी जाण्याशिवाय दुसरा पर्याय तरुणींकडे नसल्याचे पाहून काही रोडरोमियोच्या गटाने कॉलेजरोडवर चक्क त्यांच्या दुचाकीशेजारून जात त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तसेच लज्जास्पद हावभाव करून काहींनी युवतींना त्रास दिल्याचे नागरिकांनी सांगितले. या रोडरोमियोंनी दुचाकीवर एकापेक्षा अधिक बसून अंगावरचे कपडे काढून आरडाओरड करत धिंगाणा घातला. त्यांचा हा धिंगाणा कॉलेजरोडच्या प्रारंभी ‘पॉइंट’वर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला नाही, हे दुर्दैवच!
रोडरोमियोंकडून भरपावसात तरुणींची छेड
By admin | Updated: June 22, 2015 01:36 IST