नाशिक : एका रात्रीतून नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्याने लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांचेच प्रचंड हाल होत असल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. नाशिक येथील विद्यार्थ्यांना टॅब वितरणासाठी आदित्य ठाकरे आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांची दप्तरापासून सुटका करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असून, त्यासाठी मुंबई महापालिकांतर्गत तब्बल ४८० शाळांमधील १० हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले आहे. मुंबईमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्यात आले असून, वितरित करण्यात आलेल्या टॅबमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी या भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी भाषांतील शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या टॅबमध्ये नवनितच्या पुस्तकांचे स्कॅनिंग करून डिजिटल रूपात पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यातून सुटका करण्यासाठी टॅबचे वितरण करण्यात यावे अशी मागणी मागील वर्षीच आपण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली असून, त्यावर सरकारने निर्णय घेणे अद्याप बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना अडचणी येत आहे. शिवसेनेची याबाबतची भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे युटीलिटी पेमेंट पाठविण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रांगांमुळे सामान्य नागरिकांचेच हाल : आदित्य ठाकरे
By admin | Updated: November 16, 2016 00:35 IST