नाशिक : शालेय शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका न देता त्यांना फळ्यावर प्रश्न लिहून देण्याचा प्रकार राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेने केल्यानंतर आता तिडके कॉलनीतील शाळेनेदेखील असाच प्रकार आरंभीला आहे. शाळेच्या या असंवेदनशील प्रकाराविषयी पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत शिक्षण मंडळाच्या निदर्शनास सदर प्रकार आणून दिला. शुल्क न भरल्याचे कारण देत, सेंट फ्रान्सिसच्या राणेनगरपाठोपाठ तिडके कॉलनीतील शाळेनेही मुलांना प्रश्न फळ्यावर लिहून दिल्याने पालकांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी पालकांनी कायदेशीर मार्गाने सोडवणूक करण्याची मागणी शिक्षण मंडळाकडे करण्यात आली. दरम्यान, त्यावर याप्रकरणी चौकशी केली जाईल, असे शिक्षण समिती प्रशासन अधिकारी उमेश डोंगरे यांनी सांगितले. सेंट फ्रान्सिस शाळेकडून मात्र पुन्हा विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शुल्क न भरल्याचे कारण देत काही विद्यार्थ्यांना फळ्यावर प्रश्नपत्रिका लिहून देण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेत मुख्याध्यापकांसह प्रशासनासमोर आंदोलन केले. पालकांनी महापालिकेच्या शिक्षण समिती प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)
पुन्हा फळ्यावर प्रश्नपत्रिका
By admin | Updated: November 3, 2015 00:03 IST