नाशिक : चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक व तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवरच परीक्षार्थी उमेदवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण होऊन परिणामी या परीक्षेचा निकाल खोळंबला आहे. उमेदवारांनी पुराव्यानिशी नोंदविलेल्या हरकतींमुळे प्रश्नपत्रिकेच्या तपासणीतही अडथळे निर्माण होऊन गुणपत्रक लांबणीवर पडले आहे. जिल्ह्णातील तलाठ्यांची रिक्त पदे व लिपिकांची पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाहिरातीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले असता, या पदांसाठी इच्छुक असलेल्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने या दोन्ही पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर जिल्हा प्रशासनाने परीक्षा घेण्याचे निश्चित केले व त्याची सारी धुरा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी उचलली. हजारोंच्या संख्येने परीक्षार्थी असल्यामुळे एका खासगी कंपनीला या परीक्षेच्या साऱ्या तयारीचा ठेका देण्यात येऊन फक्त प्रश्नपत्रिका काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे ठेवले. त्यामुळे पुरेपूर गोपनीयता पाळत या परीक्षेची प्रश्नपत्रिका काढण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला असला तरी, त्याविषयीही काहींनी त्याचवेळी शंका उपस्थित करून प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चाही रंगली होती, तथापि त्याचे ठोस पुरावे समोर आले नाहीत. मात्र आता परीक्षा संपल्यानंतर त्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर काही उमेदवारांनी हरकती घेतल्या आहेत. लिपिक पदासाठी भाषा, गणित, सामान्यज्ञान व समाजशास्त्र अशा चार विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेनंतर तिसऱ्या दिवशी प्रशासनाने या प्रश्नपत्रिकेची उत्तरे जाहीर केल्यानंतर परीक्षार्थी उमेदवारांनी त्याची पडताळणी केली असता, प्रशासनाने विचारलेल्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे असल्याचे लक्षात आले. प्रशासनाला अपेक्षित असलेल्या उत्तरांपेक्षा उमेदवारांनी केलेल्या अभ्यासात वेगळी उत्तरे असल्याचे पुरावे गोळा करीत वीस उमेदवारांनी सात प्रश्नांना आक्षेप नोंदविले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी लेखी स्वरूपात हरकती दाखल करून, स्पष्टीकरण मागितल्याने या परीक्षेच्या निकालावरही त्याचे परिणाम झाले आहेत. ज्या उमेदवारांनी हरकती नोंदविल्या, त्यांचे समाधान करण्याबरोबरच जर प्रश्नच चुकीचा असेल, तर उमेदवारांना त्या त्या प्रश्नांचे गुण बहाल करावे लागणार आहेत. उमेदवारांच्या या हरकतींमुळे अचूक प्रश्नपत्रिका काढल्याचा प्रशासनाचा दावा यामुळे फोल ठरला आहे.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवरच प्रश्नचिन्ह
By admin | Updated: October 23, 2015 00:19 IST