नाशिकरोड : रेल्वेस्थानकावरील आरक्षण तिकीट कार्यालय येथे धक्का लागल्याच्या कारणावरून वादविवाद निर्माण होऊन एका युवकावर कटरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने सातत्याने घडणाऱ्या या प्रकारामुळे रेल्वेस्थानक परिसरात दिवसेंदिवस कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयाजवळ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील सातोना येथील रमेश साहेबराव गाडेकर व पुण्याच्या काळभोर येथील विलास शिवाजी मनकेडे, जळगाव जिल्ह्यातील हरेश्वर येथील दीपक फत्तेसिंग परदेशी यांच्यामध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून वादविवादास सुरुवात झाली. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने रमेश गाडेकर याला विलास मनकेडे, दीपक परदेशी यांनी शिवीगाळ, मारहाण करून कटरने वार करून गंभीर जखमी केले. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात घबराट पसरून धावपळ उडाली होती. यापूर्वीदेखील फिर्यादी व आरोपी यांच्यातील दोघांवर रेल्वे पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेतील संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
हद्दीच्या नावानं चांगभलं
रेल्वे व बसस्थानक परिसरात चांगलीच भाईगिरी वाढली असून, अंधार पडल्यानंतर तर कोणीच कोणाला जुमानत नाही, अशी परिस्थिती आहे. रात्री पोलीस व्हॅन आली की, व्यवसायिक तात्पुरते लाईट बंद करतात. स्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी बळावली असून, पर जिल्ह्यातील गुन्हेगार रेल्वेस्थानक परिसरात दादागिरी करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. पोलीस मात्र हद्दीचा वाद करून या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत आहे.