नाशिक : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित मुलांना प्रवेश देण्याची सक्ती करण्यास थेट विरोध न करता मेस्टाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांच्या प्रवेश नियमावलीपासून ते शुल्क आकारणी आणि थेट परताव्यापर्यंतचे एकापेक्षा एक अनेक १७ प्रश्न विचारले असून, त्यासंदर्भात मार्गदर्शन करावे मगच प्रवेश देता येऊ शकतील अशी भूमिका संस्थाचालकांच्या मेस्टा या संघटनेने केली आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सर्वच शाळांना एकूण जागेच्या तुलनेत २५ टक्के रिक्त जागा भरण्याची सर्वच शाळांना सक्ती करण्यात आली असून, त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचादेखील समावेश आहे. या प्रवेशास इंग्रजी माध्यमांच्या शाळा टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले जात असले तरी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या वतीने मात्र विरोध नसल्याचे स्पष्टीकर दिले आहेत. उलट संस्थाचालक प्रवेश देण्यास तयार आहेत; परंतु काही शंका आहेत, त्याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जे सतरा प्रश्न संस्थाचालकांनी विचारले आहेत, त्यात गेल्या तीन वर्षांपासून अशाप्रकारे २५ टक्के प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या फीचा परतावा झालेला नाही. तो कधी होणार आणि किती असणार हे सांगावे, शासन निर्णयानुसार २०१२-१३ या वर्षासाठी १२ हजार ३१५, तर २०१३-१४ या वर्षासाठी १४ हजार ६२१ रुपये असे शुल्क असेल असे स्पष्टीकरण शासनाने दिले आहे, परंतु त्यापेक्षा अधिक शुल्क असेल, तर संबंधित संस्थाचालकांना तफावत रक्कम कोण भरणार असा प्रश्न करण्यात आला आहे. सदरचे आरक्षण इंग्रजी शाळांसाठी आहे, मग बालवाडी मराठी माध्यमात करणाऱ्यांना प्रवेश द्यावा काय, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, त्याचे समाधान झाल्यास अधिक वेगाने प्रवेश देता येतील, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
वंचितांना प्रवेश देण्यासाठी संस्थाचालकांसमोर प्रश्नच प्रश्न
By admin | Updated: April 11, 2015 00:13 IST