नाशिक : अकरावी प्रवेशसाठी दुसऱ्या फेरीत ऑनलान अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रथम फेरीत प्रवेशासाची संधी न मिळू शकल्याने दुसऱ्या फेरीत पुन्हा ऑप्शन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी आज जाहीर केली जाणार आहे. या गुणवत्ता यादीनुसार प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (दि.६) त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.
शहरातील अकरावी प्रवेशप्रक्रियेची दुसरी फेरी बुधवारपासून सुरू झाली असून, पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरून प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. अथवा प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी या फेरीत देण्यात आली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत पसंतीचे महाविद्यालय निवडून ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर शुक्रवारी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्जांद्वारे प्राप्त माहितीवर प्रक्रियेसाठी राखीव वेळ ठेवण्यात आला होता. आता दुसऱ्या फेरीसाठी शनिवारी (दि. ४) गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
---
आतापर्यंतची प्रवेशप्रक्रिया
कनिष्ठ महाविद्यालये - ६०
उपलब्ध जागा - २५,३८०
एकूण अर्ज - २३,९७४
अर्जांची पडताळणी - २१,५३२
पर्याय निवडले - १९६८४
प्रवेश निश्चित - ८८९६
रिक्त जागा - १६४८४