नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी श्री गंगा गोदावरी पुरोहित संघाने परस्पर थेट पंतप्रधानांना भेटून दिलेल्या निमंत्रणावरून उद्भवलेला वाद अखेर शमला असून, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास आणि नाशिक महापालिका यांना टाळून ‘हायफाय’ बनण्यास चाललेल्या पुरोहित संघाने महंतांच्या चरणी डोके ठेवल्यानंतर मंगळवारी (दि.१४) होणारा ध्वजारोहण सोहळा आता निर्विघ्न पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उभयतांमध्ये कोणताही तंटा नसल्याचा निर्वाळा महंत ग्यानदास आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी पत्रकारांसमोर दिला आणि पुरोहित संघाने गेल्या दोन महिन्यांपासून ओढवून घेतलेल्या मनस्तापाची इतिश्री झाली. मंगळवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरू आणि रवि सिंंह राशीत प्रवेश करणार असून, तेव्हापासून सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. या ध्वजारोहण सोहळ्याचे यजमान म्हणून पुरोहित संघाने दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट भेट घेऊन निमंत्रण दिले आणि येथेच पुरोहित संघाच्या विनाशपर्वास प्रारंभ झाला. पंतप्रधानांना निमंत्रण देताना पुरोहित संघाने ना आखाडा परिषदेला विचारले ना नाशिकच्या महापौरांना सोबत घेतले. तेव्हापासून वादाची ठिणगी पडली आणि त्यानंतर महंत ग्यानदास यांच्या माध्यमातून पुरोहित संघाला शह देण्यास प्रारंभ झाला. महंतांनी प्रारंभी पुरोहित संघाच्या ताब्यात असलेले वस्त्रांतरगृहच पाडून टाकण्याचा हट्ट धरला. तेथून या वादाला महंत विरुद्ध पुरोहित संघ असे स्वरूप येत गेले. मात्र, वस्त्रांतरगृह पाडून टाकण्यास नाशिककरांचाच विरोध असल्याने अखेर महंतांनी नरमाईची भूमिका घेतानाच आमदार बाळासाहेब सानप आणि आमदार देवयानी फरांदे यांनीच आपल्या खांद्यावर बंदूक ठेवत वस्त्रांतरगृह पाडण्याचा विषय लावून धरल्याचा गौप्यस्फोट नंतर केला. त्यानंतरही पुरोहित संघाच्या मागे ‘शुक्लकाष्ठ’ कायम होतेच. महापालिकेमार्फत पुरोहित संघाचे कार्यालय दोनदा हटविण्यात आले. त्यात संघाच्या कार्यालयाचे नुकसान झाले.
पुरोहित संघ महंतांच्या चरणी
By admin | Updated: July 12, 2015 23:59 IST