नाशिक : वासाळी ग्रामपंचायतीतील गट नं. १ या ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार असून, या गटातील ग्रामपंचायतीच्या मालकीची विहीर ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली.वासाळी गावातील गट नं.१ ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचेही परदेशी यांनी सांगितले. मात्र यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी ग्रामपंचायती विरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली असल्याने न्यायालयीन बाब तपासून ही अतिक्रमित जागा पुन्हा ग्रामपंचायतीच्या अधिकारात घेण्याबाबत कारवाई करण्यात येईल, असेही रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले. वासाळी गाव नाशिक महापाालिका हद्दीलगत असून, तेथे जागेचे भाव गगनाला भिडलेले आहे. त्यातच वासाळी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असलेल्या गट नं. १ मधील काही जागेवर संबंधित गावातील ग्रामंपचायत सदस्यांच्या नातलगांनी अतिक्रमण केल्याचा तक्रार अर्ज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे यापूर्वीच करण्यात आला होता. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी दिले होते. त्यानुसार परदेशी यांनी याप्रकरणी चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांच्या अहवालानुसार गट नं. १ ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याने त्यावर अतिक्रमण केले म्हणून आठ ग्रामस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. तसेच या जागेतील विहिरीवरून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने ही विहीर ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याबाबत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे ८ आॅक्टोबर रोजी प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचे गट विकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले. तसेच न्यायालयीन प्रकरण तपासून उर्वरित अतिक्रमित जागाही ताब्यात घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
वासाळीतील सार्वजनिक विहीर घेणार ताब्यात
By admin | Updated: October 5, 2015 23:55 IST