नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक कामकाजाचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार महापालिकेचे कामकाज पारदर्शक पद्धतीने करा, असा सल्ला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेच्या नूतन कारभाऱ्यांना दिला आहे. मागील कारभाराप्रमाणेच कामकाज केले तर लोकांना वेगळेपण दिसणार नाही, त्यामुळे वेगळ्या स्वरूपाचे कामकाज करा असे सांगतानाच लोकसंपर्काअभावी नाशिकमध्ये मनसेचे चाळीसवरून अवघे चार नगरसेवक अशी स्थिती झाली असून, त्याचे स्मरणही त्यांनी नगरसेवकांना करून दिले. स्वबळावर महापालिकेत सत्ता प्रस्थापित करणाऱ्या भाजपाने महापौरपदी रंजना भानसी आणि उपमहापौरपदी प्रथमेश गिते यांची निवड झाल्यानंतर वसंत स्मृती येथे त्यांचा पक्षाच्या वतीने सत्कार केला. त्यावेळी महाजन यांनी हे आवाहन केले. व्यासपीठावर पक्षाचे संघटन मंत्री रवि भुसारी, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेत सत्ता येईल किंवा नाही याबाबत शंका होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने कल फिरवला आणि सर्व्हेनुसार भाजपाला ४० च्या आत जागा मिळण्याची शक्यता असताना जनतेने ६६ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून दिले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षाला यश मिळाले आहे. हे यश व्यक्तिगत उमेदवारांचे नसून पक्षामुळे आणि पक्षातील कार्यकर्त्यांमुळेच मिळाले आहे, असे सांगून त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी आणि नगरसेवकांना विनम्र राहण्याचा आणि कायम लोकांशी संपर्क कायम राखण्याचा सल्ला महाजन यांनी दिला. अनेक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत, त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांच्या कामाची जाणीव ठेवावी. गेल्या वेळी मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले होते, परंतु लोकसंपर्काअभावी आता त्यांचे अवघे चार नगरसेवक निवडून आले आहेत, याचे स्मरणही त्यांनी करून दिले.
मनसेसारखी अवस्था टाळण्यासाठी लोकसंपर्क आवश्यक : महाजन
By admin | Updated: March 14, 2017 21:23 IST