गणेश शेवरे
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : तोलाई, हमाली, वाराई च्या वादामुळे गेल्या महिनाभरापासून माथाडी कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यातच व्यापाऱ्यांनी खाजगी बाजार समिती स्थापन करून हमाल मापारी माथाडी कामगारांच्या पोटावर कुऱ्हाड मारली. त्यामुळे सदर माथाडी कामगारांची सहन शक्ती संपत आज (दि.२९) पिंपळगाव बाजार समितीच्या आवारातच सरण रचून आंदोलनास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या बाजार समितीतील शेतमालाचे लिलाव गेल्या महिन्याभरापासून ठप्प आहेत. त्यामुळे सदर कांदा लिलाव खाजगी बाजार समितीत होत असून त्याला शांततेच्या मार्गाने माथाडी कामगारांनी विरोध करत धरणे आंदोलन केले मात्र त्या आंदोलनाची कोणीही दखल न घेतल्याने माथाडी कामगार संतापले आहेत. गेल्या महिना भरापासून बेरोजगार झालेल्या माथाडी कामगारांनी अखेर बाजार समितीतच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच सरण रचून त्यावर बसून आंदोलन सुरू केले आहे.