नाशिकरोड : वीजदरवाढ प्रस्ताव रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी नाशिक इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करून निषेधाच्या घोषणा देत मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले. राज्यात सर्वत्र वीजदर एकसारखा असावा, मराठवाडा-विदर्भ येथील वीजदर कमी व इतर ठिकाणी वीजदर जास्त असा प्रांतिक वाद निर्माण करू नये, वीजदरवाढ केल्यास नाशिक जिल्ह्यातील कारखाने बंद पडतील. त्यामुळे प्रस्तावित वीजदरवाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी सकाळी बिटको चौकाजवळील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर नाशिक इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून निषेधाच्या घोषणा दिल्या. महावितरणच्या प्रवेशद्वारावर वीजदरवाढ प्रस्तावाची होळी केली.यावेळी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित वीजदरवाढ रद्द करण्यात यावी, वीजदरवाढीस उद्योजक, कारखानदार, कामगार आदि सर्वांचा तीव्र विरोध असून, वीजदरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. आंदोलनामध्ये निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, आयमा अध्यक्ष राजेंद्र आहिरे, लघुउद्योग भारती अध्यक्ष संजय महाजन, ऊर्जा समिती अध्यक्ष मिलिंद राजपूत, अॅड. सिद्धार्थ सोनी, मंगेश पाटणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर, राजू लवटे, राष्ट्रवादीचे अॅड. रवींद्र पवार, छबू नागरे, मनोहर कोरडे, कॉँग्रेसचे राजाराम पानगव्हाणे, निखिल पांचाळ, राजेंद्र कोठावदे, सुधाकर देशमुख, जयंत पवार, रमेश धोंगडे, नितीन चिडे, आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
प्रस्तावाची होळी
By admin | Updated: July 5, 2016 00:26 IST