नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळ आटोपल्यानंतर रिकाम्या झालेल्या साधुग्रामच्या जागेचा उपयोग प्रदर्शनांसाठी करण्याचा प्रस्ताव उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी महापालिका आयुक्तांसमोर ठेवला असून त्याचा प्रारंभ डिसेंबरमध्ये भरणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्याचाही मानस व्यक्त केला आहे. तपोवनातील महापालिकेच्या ५४ एकर जागेसह सुमारे ३३५ एकर जागेवर साधुग्रामची उभारणी करण्यात आली होती. आता सिंहस्थ पर्वणीकाळ आटोपल्यानंतर साधुग्राम खाली झाले आहे. सदर जागेचा उपयोग विविध प्रदर्शने भरविण्यासाठी करण्यात यावा, त्यातून महापालिकेला महसूल प्राप्त होईलच शिवाय शहरातील प्रदर्शनीय मैदानाची संकल्पनाही आकारास येईल, असा प्रस्ताव उपमहापौर बग्गा यांनी मांडला आहे. त्यानुसार, दरवर्षी डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर भरविण्यात येणारे कृषी प्रदर्शन यंदा साधुग्राममधील जागेत भरविण्याचा मानसही व्यक्त केला आहे. त्यासाठी कृषी प्रदर्शनाचे संचालक संजय न्याहारकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही त्यास संमती दर्शविली आहे. दरम्यान, आयुक्तांनीही या संकल्पनेचे स्वागत करत तसा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)
साधुग्रामच्या जागेवर प्रदर्शनाचा प्रस्ताव
By admin | Updated: October 10, 2015 00:03 IST