नाशिक : कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने जे शेतकरी कर्जाचे हप्ते व कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतील, अशा शेतकऱ्यांना बँकांकडून खरीप हंगामासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीक कर्जाबाबत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहमद आरीफ, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रू शेखर यांच्यासह सहकारी बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेला निधी कर्जमाफीसाठीच वापरण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांनी सहकारी संस्थांमार्फत घेतलेल्या कर्जाच्या रकमेची वसुली करण्यासाठी त्यांच्या जमिनींचे लिलाव करण्यासाठी सध्याचे वातावरण अनुकूल नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली असून त्यांना नव्याने कर्ज घ्यायचे आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांकडून आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यात यावीत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत व सुरळीतपणे कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. २०२१-२२ या वर्षात २७०० कोटी रुपयांचे कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी दोन महिन्यांत ४४५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून, मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत दिली.