त्र्यंबकेश्वर : तालुक्यात अनुसूचित जमाती समितीने भेट देऊन भिलमाळ आदिवासी आश्रमशाळा, अंबोली आश्रमशाळा, तसेच हरसूल ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ग्रामीण भागातील या रुग्णालयाचे कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरली जातील आणि बालरोग व भूलतज्ज्ञांची नेमणूक करण्याचे आश्वासन समितीने यावेळी दिले.
त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा यांनी रुग्णालयातील कामकाजाची माहिती जाणून घेतली. ग्रामीण रुग्णालयाला संगणक व जनरेटर त्वरित पुरवण्यात यावेत, तसेच १०२ क्रमांकाची रुग्णवाहिकाही पाठवावी, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या. आश्रमशाळांसाठी वैद्यकीय पथक नियुक्त केले जाईल, असेही दरोडा यांनी सांगितले. परतीच्या मार्गावर जातेगाव येथील सिंचन प्रकल्प, तसेच वाघेरा येथील आश्रमशाळेला भेट दिली.
इन्फो
आज पंचायत राज समिती
त्र्यंबक तालुक्यात शुक्रवारी (दि.२७) पंचायतराज समितीचा दौरा आहे. या समितीकडून काहीही अचानक पाहणी होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आहे. विधान मंडळाने नियुक्त केलेल्या या समितीत ३१ आमदारांचा समावेश आहे. समितीचे प्रमुख आमदार संजय रायमुलकर असून, निफाडचे आमदार दिलीपराव बनकर व आमदार किशोर दराडे यांचाही त्यात समावेश आहे. पंस कार्यालयांतर्गत सर्व विभागांचा सन २०१६-१७ च्या लेखापरीक्षणाचा आढावा ते घेणार आहेत.