नाशिक : प्रतिवर्षाप्रमाणे कापडपेठेतील बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सव उत्साहात साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने सुदर्शन दिग्विजय रथाची मिरवणूक नगर परिक्रमा काढण्यात आली. कापडपेठेतील बालाजी मंदिर तब्बल ३२५ वर्षे जुने असून, तेथे आश्विन शुद्ध १५ पर्यंत ब्रह्मोत्सव साजरा होणार आहे. मंगळवारी काढण्यात आलेल्या रथ सोहळ्यात मंदिराचे महंत विक्रम बालाजीवाले यांनी रथाकडे तोंड करून पूर्ण परिक्रमा उलट्या पावली पूर्ण केली. यावेळी ठिकठिकाणी सुवासिनींनी रथाचे औक्षण करून पूजन केले. मिरवणुकीत बालाजी मूर्ती आणि ध्वज घेऊन भाविक सहभागी झाले होते. घंटानाथ, शंखध्वनीच्या निनादात बालाजी मंदिर, दहीपूल, सोमवारपेठ, तिवंधा, जुनी तांबट लेन, पार्श्वनाथ लेन, हुंडीवाला लेन, पगडबंद लेन, सराफ बाजारपासून पुन्हा बालाजी मंदिर अशी परिक्रमा काढण्यात आली. सकाळी पुण्याहवाचन, घटस्थापना, पवमान अभिषेक आदि धार्मिक विधी झाले. हर्षवर्धन बालाजीवाले यांनी मिरवणुकीचे नियोजन केले.
सुदर्शन दिग्विजय रथाची मिरवणूक
By admin | Updated: October 14, 2015 22:40 IST