नाशिक : खासगी क्लासेसचे प्रस्थ वाढत असताना, शिक्षण उपसंचालकांनी आता याबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांवरच बडगा उगारला आहे. महाविद्यालयातील वर्गांत अनुपस्थित राहून विद्यार्थी खासगी क्लासेसमध्ये हजेरी लावत असतील, तर या प्रकाराला प्राचार्यांची संमती आहे असे गृहीत धरून थेट त्यांच्यावरच कारवाई केली जाईल, तसेच संबंधित महाविद्यालयातील प्रवेश रद्द केले जातील, अशी ताकीदच शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी दिली आहे. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी चांदवड येथे जिल्हाभरातील प्राचार्यांची बैठक घेतली. या बैठकीत सूर्यवंशी यांनी सदर सूचना केली. सध्या सर्वत्र खासगी क्लासेसचे प्रस्थ वाढत आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे वर्ग ओस पडत असताना, त्याच वेळेत खासगी क्लासेसमध्ये मात्र विद्यार्थी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे पालकांना महाविद्यालय व क्लासेसच्या फीचा दुहेरी भुर्दंड सोसावा लागत आहे. हा प्रकार शिक्षण खात्याने गांभीर्याने घेतला आहे. महाविद्यालयीन वेळेत जर विद्यार्थी अनुपस्थिती असेल व ते खासगी क्लासेसला जात असेल, तर याला त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची संमती आहे, असे गृहीत धरले जाईल. संबंधित प्राचार्यांवर थेट कारवाई केली जाईल. याशिवाय महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द केले जाईल, असे सूर्यवंशी यांनी या बैठकीत सांगितले. शिक्षण खात्याच्या वतीने महाविद्यालयांना अचानक भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे. या भेटीत वर्ग रिकामे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
खासगी क्लासेसवरून प्राचार्यांवर बडगा
By admin | Updated: June 12, 2015 00:03 IST