नाशिक : हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा भरणा म्हणून स्वीकारण्याची जी ठिकाणं शासनाने जाहीर केली आहेत त्यामध्ये महावितरणचादेखील समावेश आहे. मात्र महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्राकडून ग्राहकांना २००० रुपयांच्या नोटेच्या बदल्यात जुन्या हजार, पाचशेच्या नोटा घेण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे भरणा केंद्रावर वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी राज्य शासनाने महावितरणला हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वीजबिल भरणा म्हणून ग्राहकांकडून हजार, पाचशेच्या नोटा भरल्या जात आहेत. परंतु यामुळे ग्राहकच मोठा अडचणीत आला आहे. बिल भरणा केंद्राकडे परत देण्यासाठी शंभर, पन्नासच्या नोटाच नसल्याने ग्राहकांना पूर्ण रकमेचे वीजबिल भरावे लागत असून असंख्य ग्राहकांचे आगाऊ बिल भरून घेतले जात आहे. शासनानेदेखील केवळ भरणा केंद्राच्या सुविधेविषयीच घोषणा केली आहे, मात्र सुटे पैसे देण्या-घेण्याबाबत कोणतीची सूचना नसल्याने त्याचा गैरफायदा घेत वीजबिल भरणा केंद्राकडून ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. वास्तविक महावितरणने वीजबिल भरणा केंद्राचे खासगीकरण केलेले आहे. त्यांची संपूर्ण वसुली ही खासगी संस्थेमार्फत केली जाते. आता केवळ शासनाने घोषणा केल्यामुळे वीजबिल भरणा केंद्र ज्या वीज कार्यालयाच्या मालकीच्या इमारतीमध्ये आहे अशाच ठिकाणी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांच्या हजार, पाचशेच्या नोटा हमीपत्र घेऊन स्वीकारत आहेत. म्हणजे खासगी संस्थेच्या कामासाठी महावितरणचे कर्मचारी राबत असून ग्राहकांशी ग्राहकांच्या वतीने महावितरण हमीपत्र भरून देत आहे. इतर ठिकाणी मात्र वीजबिल भरणा केंद्रांकडून ५००, हजारच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे समजते. (प्रतिनिधी)
अगोदर हमीपत्र, मग जुन्या नोटांचा भरणा
By admin | Updated: November 16, 2016 22:47 IST