पंचवटी : निमाणी बसस्थानकासमोर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी शनिवारी (दि़२३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी मटका खेळणाऱ्या आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ५४ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे़ निमाणी बसस्थानकासमोरील एका दुकानात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर यांना मिळाली होती़ या माहितीनुसार या ठिकाणी छापा टाकला असता मटका अड्डाचालक भरत गुंजाळसह प्रकाश चव्हाण, मनोहर डिसूझा, सलीम शेख, संदीप गोरे, कैलास धुमाळ, इंद्रभूषण वर्मा, दिगंबर भोई या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ तसेच या अड्ड्यावरून ५४ हजारांची रोकड व जुगाराचे साहित्यही जप्त केले आहे.पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील पुजारी, पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले आदिंसह गुन्हा शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या संशयितांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापे टाकण्याची मोहीम सुरू केल्याने जुगारींचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)
पंचवटीत जुगार अड्ड्यावर छापा
By admin | Updated: July 25, 2016 00:22 IST