नाशिक : प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. या मोर्चाचे नेतृत्व पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांनी केले. दुपारी बारा वाजता गोल्फ क्लब मैदानापासून निघालेला हा मोर्चा जुना त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद मार्गे, शालिमार, टिळकपथ मार्गे महात्मा गांधी रोडने जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आंतर जिल्हाबदलीसाठी राज्यस्तरावर एकच रोष्टर करून हा प्रश्न सोडवावा, शिक्षक पदनिर्धारणाच्या निकषामध्ये सुधारणा करावी, शिक्षकांना शाळाबाह्य कामातून मुक्त करावे, शिक्षकांना पोलीस पंचनाम्यासाठी सरकारी साक्षीदार म्हणून बोलवू नये, शालेय पोषण आहार योजना दुसऱ्या यंत्रणेकडून राबविण्यात यावी, संगणक प्रशिक्षणाला २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी यांसह सुमारे ३० मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात संघटनेचे अंबादास वाजे, आर. के. खैरनार, सुभाष अहिरे, युवराज पवार, बाबासाहेब पवार, प्रमोद शिरसाठ, रवि थोरात, अरुण कापडणीस, राजेंद्र पाटील, बाजीराव सोनवणे, विनायक ठोंबरे यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षक संघटनेचा मोर्चा
By admin | Updated: October 31, 2015 23:57 IST