नाशिक : महापालिकेच्या वतीने फेरीवाला क्षेत्रासाठी प्रारूप तयार करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्तालयानेदेखील यासंदर्भात तयार केलेला अहवाल पालिकेला सादर केला आहे. त्यानुसार शहराच्या कोणत्या भागात नो पार्किंग झोन, शांतता क्षेत्र, प्रवेश निषिद्ध या संदर्भातील यादीच सादर करण्यात आली आहे.केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणाची महापालिकेच्या वतीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. महापालिकेने शहर फेरीवाला समिती स्थापन केल्यानंतर शहराच्या विविध भागांतील प्रारूप फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, सुमारे साडेतीनशे ठिकाणी फेरीवाला क्षेत्र असणार आहे. सदरचा प्रस्तावित आराखडा महापालिकेने पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. शहर वाहतुकीच्यादृष्टीने त्यांनी अभ्यास करून पोलीस आयुक्तालयाने अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार शहरात प्रवेश बंद असलेली २४ ठिकाणे प्रस्तावित असून, ५१ ठिकाणी नो पार्किंग झोन आहे. सम आणि विषम तारखांना पार्किंग तसेच शांतता क्षेत्र १९ ठिकाणी प्रस्तावित आहे. महापालिकेचे प्रारूप फेरीवाला क्षेत्र आणि पोलिसांचा अहवाल शहर फेरीवाला समितीच्या येत्या बैठकीत सादर करण्यात येणार असून, त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
फेरीवाला क्षेत्रासाठी पोलिसांचा आराखडा तयार
By admin | Updated: May 8, 2015 00:44 IST