जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांकडे कांद्याचा साठा तुंबल्यामुळे बाजारात कांद्याची प्रचंड आवक होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ९ वाजता लिलावास सुरुवात होईल. शेतकऱ्यांनी मास्क परिधान करूनच लिलावात सहभागी व्हावे, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
सध्या मोसम खोऱ्यासह बागलाण तालुक्यात उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम जोमाने सुरू आहे. यंदा कांद्याच्या बियाण्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. त्यामुळे उन्हाळ कांद्याऐवजी रांगडा कांद्याचे उत्पन्न निघाल्याने मातीमोल भावाने कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. मार्च महिन्यात मोसम खोऱ्यात अवकाळी पाऊस व प्रचंड गारपीट झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर कांदा साठवण्यास योग्य नसल्याने बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे.
नामपूर परिसरासह मोसम खोऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी लिलावाप्रसंगी आपल्या चेहऱ्यावर मास्क किंवा रूमाल बांधणे आवश्यक असल्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. तसेच कांद्याच्या लिलावानंतर जमिनीवर पडलेला कांदा पुन्हा ट्रॉलीत भरण्याच्या लिलावाची तांत्रिक अडचण असल्यामुळे शेतकऱ्यांनाच आपला माल ट्रॅक्टरमध्ये भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लिलावास येताना सोबत पाटी आणावी, आपल्या मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
कोट.....
नामपूर बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने अनेकदा आंदोलन करण्यात आली. कोरोनाच्या काळात अन्नपुरवठा साखळी सुरळीत राहण्यासाठी लिलाव बंद पडू नये. अशी संघटनेची आग्रही भूमिका आहे. सकाळी नऊ ते दोन या काळात पूर्ण क्षमतेने लिलाव होणार असल्याने शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होईल.
- अभिमन पगार, जिल्हा उपाध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना