सिन्नर : प्रेयसीचा गळा आवळून खून केल्यानंतर प्रियकराने गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. सिन्नर-घोटी रस्त्यावरील हरसुले फाट्याजवळील हॉटेल राजे पार्कमधील लॉजमध्ये सदर प्रकार घडला. सदर प्रेमीयुगुल सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील आहे. या घटनेमुळे मुसळगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळगाव येथील संदीप रामदास जोंधळे (२०) या युवकाने आपण पती-पत्नी असल्याचे सांगून हरसुले फाट्यावरील हॉटेल राजे पार्क येथे पहिल्या मजल्यावर १०३ ही खोली भाड्याने घेतली होती. सोमवारी सायंकाळपर्यंत खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय आल्याने हॉटेल व्यवस्थापक संदीप पाटोळे यांनी सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे, उपनिरीक्षक विनोद घुईकर, हवालदार नितीन मंडलिक, रमेश निकम, सुदेश घायवट, सुदाम धुमाळ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दरवाजा तोडून आत प्रवेश केला. खोलीमध्ये संदीप रामदास जोंधळे (२०) याने नायलॉन दोरीने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले, तर बाजूला निशा अरुण माळी (१९) या युवतीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी जवळील कॅरिबॅग तपासल्यानंतर त्यात दोघांचे ओळखपत्र मिळून आल्याने उभयतांची ओळख पटली.(वार्ताहर)
प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्त्या
By admin | Updated: September 16, 2015 22:06 IST