नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या काल (दि. १७) झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे दिंडोरी तालुक्यातून निवडून आलेले प्रमोद मुळाणे यांची अध्यक्षपदी, तर सुरगाण्यातून बिनविरोध निवडून आलेले चिंतामण गावित यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.काल सकाळपासूनच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी चर्चेची गुऱ्हाळे सुरू होती. सहकार पॅनलचे नेते राजेंद्र भोसले, केदा अहेर, शिवाजी रौंदळ, दिलीप पाटील यांनी इगतपुरी येथे इच्छुकांची मते जाणून घेतली. त्यात अध्यक्ष पदासाठी माजी अध्यक्ष संपतराव सकाळे, शिवाजी रौंदळ यांच्यासह प्रमोद मुळाणे, संभाजीराजे पवार, योगेश हिरे, नीलेश अहेर यांच्यासह अर्धा डझनहून अधिक इच्छुकांनी तयारी दर्शविली होती. नव्यानेच निवडून आलेल्या संचालकांनीही उपाध्यक्ष पदासाठी तयारी दर्शविली होती. अखेर मजूर संघाच्या अध्यक्षपदासाठी शेवटी संपतराव सकाळे व प्रमोद मुळाणे यांची दोन नावे तसेच उपाध्यक्ष पदासाठी हरिभाऊ वाघ व चिंतामण गावित ही दोन नावे शिल्लक राहिली. मात्र त्यानंतर अध्यक्ष पदासाठी प्रमोद मुळाणे यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी चिंतामण गावित यांनी उमेदवारी फॉर्म भरण्याचे निश्चित झाले. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता पॅनलचे नेते राजेंद्र भोसले, केदा अहेर, शिवाजी रौंदळ, राजाराम खेमनार यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी प्रमोद मुळाणे यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी चिंतामण गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विहित वेळेत दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खरे यांनी जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोेद मुळाणे यांची तर उपाध्यक्षपदी चिंतामण गावित यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हा मजूर संघाचे संचालक दिनकर उगले, नीलेश अहेर, योगेश गोलाईत, प्रमोद भाबड, शशिकांत आव्हाड, विठ्ठल वाजे, जगन वाजे, शशिकांत उबाळे, माजी संचालक संजय चव्हाण, सचिव सुनील वारूंगसे, संजय बडवर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद मुळाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2016 22:51 IST