नाशिकरोड : एकलहरेजवळील कालवी, गंगापाडळी गावातील शेतातून टाकण्यात येणारी २२० केव्ही दुहेरी परिपथ अतिउच्च दाबाच्या वाहिनीचे काम महापारेषण कंपनीने नकाशा व नियमानुसारच करावे, अशी सूचना हेमंत गोडसे यांनी महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. पिंपळगाव बसवंतपासून एकलहरेपर्यंत महापारेषण कंपनीकडून २२० केव्ही दुहेरी परिपथ अतिउच्च दाबाची वाहिनी टाकण्याचे सुरू असलेल्या चुकीच्या कामाबाबत खासदार हेमंत गोडसे यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिउच्च दाबाची वाहिनी उभारण्यापूर्वी महापारेषण कंपनीने एकलहरे जवळील कालवी येथे शेतकरी पांडुरंग लोटे (गट क्र. ११६), भाऊराव अनवट (गट क्र. ९७), बाळू दत्तू अनवट (गट क्र. ९०), केरू नागू अनवट (गट क्र. २५) या ठिकाणी वाहिनीकरिता टॉवर उभारणार असल्याचे सर्व्हेमध्ये सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात सुभाष खर्जुल (गट क्र. २६) मध्ये टॉवरकरिता फाउंडेशन उभारणीचे काम केले आहे. तसेच गंगापाडळी गावात रामकृष्ण वलवे (गट क्र. १२७), दशरथ वलवे (गट क्र. १२५) या दोघांच्या शेताच्या बांधावर टॉवर उभारण्याचे सर्व्हेमध्ये म्हटले होते. जमिनीच्या दक्षिण बाजूला नकाशामध्ये टॉवर दाखविला होता. मात्र प्रत्यक्षात अतिउच्च दाब वाहिनीचे काम करताना नकाशाप्रमाणे असलेल्या वाहिनीची जागा बदलली असून, रामकृष्ण वलवे यांच्या गट क्र. १२७ मध्ये उत्तर बाजूला टॉवर उभारण्यात येत आहे. गंगाधर वलवे यांच्या गट क्र. ९४ मध्ये नकाशाप्रमाणे टॉवरचे स्थान बदलले आहे. कोंडाजी वलवे (गट क्र. ८२/८), सोमनाथ बोराडे (गट क्र. ८२) या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर दाखविलेल्या टॉवरचे काम सुरू नाही. भास्कर गोपाळे (गट क्र. ५८/८) मध्ये नकाशात दाखविलेला टॉवर प्रत्यक्षात दत्तात्रय भीमाजी वलवे यांच्या गट क्र. ५९ मध्ये उभारण्यात येत आहे. तर शांताराम दगडू वलवे गट क्र. ३४, शांताराम रामचंद्र वलवे गट क्र. ३५ येथे नकाशात टॉवर नसताना पाचवा नवीन टॉवर उभारण्यात येत आहे. नकाशानुसार व नियमानुसार अतिउच्च दाब वाहिनी व टॉवरचे उभारणीचे काम होत नसून वाहिनी व टॉवर स्थलांतरित करीत शेतकऱ्यांचे नुकसान केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
वीज वाहिनी नियोजित मार्गाऐवजी शेतातून
By admin | Updated: January 12, 2017 00:35 IST