पंचवटी : तपोवन ब्रह्मचर्य आश्रम संचलित श्री स्वामी नारायण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पोस्ट आॅफिस डे साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका शहरातून दुसऱ्या शहरात तसेच एका देशातून दुसऱ्या देशात पत्र कशा पद्धतीने पोहचते तसेच पत्रांचे वेगवेगळे प्रकार, रंग, आकार, ग्रीटिंग कार्ड तसेच पूर्वीपासून पत्रव्यवहारांच्या चालत आलेल्या पद्धती याविषयी विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या पद्धतीने पोस्ट आॅफिस डे साजरा करून समजावून सांगण्यात आला. शाळेच्या माण्टेसरी विभागात झालेल्या या कार्यक्रमात मॉँटेसरी विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक नाटिका सादर केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्यालयाला भेट दिली व तेथील व्यवहाराविषयीची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी टपालपेटी, टपालपत्रे तयार केली होती. काही विद्यार्थ्यांनी पोस्टमनची वेशभूषा केली होती. यावेळी शाळेचे विश्वस्त ज्ञानपुराणी महाराज, माधवप्रकाश स्वामी, मुख्याध्यापक अस्मिता पटेल, अनिता डापसे, चित्रा पगारे, वैशाली काकोडकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जोशी यांनी केले. (वार्ताहर)
श्री स्वामीनारायण शाळेत टपाल दिवस
By admin | Updated: October 9, 2015 22:43 IST