नाशिक : नाशकात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आरोग्य सचिवांना प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना दिल्या असून, येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात येऊन नाशिकमध्ये महाविद्यालय सुरू होऊ शकेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, आपल्याकडे वैद्यकीय खाते आल्यामुळे कालच या संदर्भात आरोग्य सचिवांशी आपली चर्चा झाली. नाशिक येथे इमारतही तयार असल्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय चांगले होऊ शकते, अशी आपली धारणा झाली असल्याचे महाजन म्हणाले. या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात येण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रे असो वा जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा आपला प्रयत्न राहील तसेच बांधून तयार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्टाफ पॅटर्न लवकरात लवकर मंजूर करण्याचा आग्रह धरण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतींकडून वसूल केली जाणारी पाणीपट्टीची रक्कम पाटबंधारे खात्याला मिळावी जेणे करून या रकमेतून धरणे, कॅनॉल, योजनांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल असा विचार सध्या सुरू असून, लवकरच याबाबत शासन ठोस निर्णय घेईल व तसा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवण्यात येणार असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
नाशकात लवकरच पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय
By admin | Updated: July 14, 2016 01:34 IST