नाशिक : ज्या सिंहस्थ कुंभमेळ्याची बारा वर्षे प्रतीक्षा करून रामकुंडात शाहीस्रानाने पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी साधू-संत, तसेच कोट्यवधी भाविकांची चढाओढ सुरू असते, त्या दिवशीच रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्णय अंगलट येण्याची शक्यताच अधिक आहे. मुळात रामकुंड असो वा प्रशासनाने विकसित केलेला नवीन घाट असो गोदावरी गाठण्यासाठी दुतर्फा उताराचेच रस्ते असताना अशा रस्त्यांवर लाखो भाविकांना अडवून नंतर त्यांना स्रानासाठी रस्ता मोकळा केल्यास गर्दीच्या लोंढ्यात चेंगराचेंगरी होण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीच्या दिवशी साधू-महंत व बाहेरगावच्या भाविकांच्या स्रानानंतरच नाशिककरांनी रामकुंड परिसरात प्रवेश करावा तोपर्यंत या भागातील रस्ते वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचे नियोजन पोलीस प्रशासन करीत असून, तसे संकेत पोलीस आयुक्तांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. याचाच अर्थ शाही मार्गावरून मिरवणूक निघेल त्या मार्गावरून भाविकांना जाण्यास मज्जाव केला जाईलच; परंतु या मार्गाला जोडणाऱ्या उपरस्त्यांवरही बॅरेकेडिंग केली जाण्याची शक्यता आहे. शाही मिरवणूक मार्ग वगळता अन्य उपरस्त्यांनी भाविकांनी रामकुंडापर्यंत येऊ नये म्हणून कोअर गृप केला जाणार आहे.म्हणजेच रामकुंड, गांधीतलाव व रोकडोबा मैदान या तीनही महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत भाविक साधू-महंतांचे स्रान पूर्ण होईस्तोवर जाऊ शकणार नाही. त्यासाठी गोदावरीला येऊन मिळणारे सर्व रस्ते अडविले जाणार आहेत. एकीकडे शाही पर्वणीच्या दिवशी ८० लाख ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता प्रशासनच व्यक्त करीत असताना काही हजारांच्या घरात संख्या असलेल्या साधू-महंतांच्या स्रानासाठी लाखो भाविकांना तब्बल चार ते पाच तास अडवून धरणे मोठे जिकिरीचे होणार आहे. गोदावरी नदीच्या पात्राकडे जाण्यासाठी येऊन मिळणारे सर्वच रस्ते उताराचे असून, गत सिंहस्थात सरदार चौकातील उतारच दुर्घटनेला कारणीभूत ठरून कुंभमेळ्याला गालबोट लागल्याचा इतिहास आहे. रामकुंडाला पंचवटीकडून येऊन मिळणारे रस्ते असो वा नाशिककडून रामकुंड, गांधीतलाव वा रोकडोबा मैदानाकडे जाणारे रस्ते असो दोन्ही बाजूंनी उताराच्या रस्त्यांशिवाय पर्यायच नसताना अशा उताराच्या रस्त्यांवर भाविकांना अडवून धरून नंतर अचानक त्यांच्यासाठी रस्ता मोकळा केल्यास स्रानासाठी अधीर झालेल्या लाखो भाविकांमध्ये धावपळ व त्यातून चेंगराचेंगरी होण्याचीच शक्यता अधिक असल्याचे या भागातील जाणकारांचे म्हणणे आहे. म्हणजेच सिंहस्थ कुंभमेळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत, त्यातून अनुचित घटना घडण्याचीच भीती अधिक दिसू लागली आहे.
रस्ते अडविल्यास चेंगराचेंगरीची शक्यता
By admin | Updated: July 3, 2015 00:20 IST