नाशिक : मॉन्सूनचे वेळेवर आगमन होण्याची शक्यता गृहीत धरून ‘शतकोटी’ वृक्ष लागवडीची तयारी करणाऱ्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मनसुब्यावर लांबणीवर पडलेल्या मॉन्सूनने पाणी फेरले आहे, परिणामी १२ ते १९ जून दरम्यान वृक्षलागवडीच्या सप्ताहाला मुदतवाढ देण्याचा विचार सुरू झाला आहे. तथापि, काल जिल्ह्णात सक्रीय झालेल्या मॉन्सूनमुळे वृक्ष लागवडीसाठी तातडीने खड्डे खणण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णात पावसाळ्यात ७३ लाखांहून अधिक वृक्ष लागवडीचा संकल्प यंदा करण्यात आला असून, त्यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग, सामाजिक वनीकरण या खात्यांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मान्सूनचे वेळेवर आगमन होईल तत्पूर्वी त्यासाठी तयारीचा भाग म्हणून वृक्ष लागवडीची विशेष मोहीम निश्चित करण्यात आली. त्यानुसार १२ जून रोजी जिल्ह्णात सर्वत्र या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, परंतु पावसाने पाठ फिरविल्यामुळे ज्या ठिकाणी वृक्षलागवड करायचे नियोजन करण्यात आले होते, ते आता पुढे ढकलले जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या जागेत, शाळेच्या आवारात, पांदी रस्ते, जिल्हा व राज्य मार्ग तसेच ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांवरही वृक्ष लावण्याची मुभा असल्यामुळे आता पावसाचा अंदाज पाहून तातडीने खड्डे खोदण्याच्या सूचना रोहयो उपजिल्हाधिकारी गाडीलकर यांनी यांनी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या असून, त्यानुसार ११ लाख ४४ हजार खड्डे खणण्यात आले आहेत. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे जिल्ह्णात आजवर १९ हजार ७७५ इतकीच लागवड होऊ शकली आहे. यंदाच्या लागवडीत लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली असून, ग्रामपंचायतीने दोनशे झाडांमागे एका मजुराची नेमणूक करायची, तर त्यावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाचा अधिकारी समन्वयक म्हणून नेमण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे.
मॉन्सूनचे वेळेवर आगमन होण्याची शक्यता
By admin | Updated: June 17, 2014 00:08 IST